Friday, February 4, 2011

Gurucharitra - Adhyay 38

Chapter 38 With this chapter we are going to see the Bhaktikand. Brahmin named Bhaskar who brings food sufficient only for 3 people, feeds more than four thousand people with blessing of Guruji.

Chapter 38

Four Thousand Fed with Food of 3 Seers only.

Some one did Samaradhna (feeding of Brahmins) on every day and Shri Guru was invited with his disciples. Once a poor Brahmin named bhaskar, of Kashyap Gotra came there. He also wished to do Samaradhna and offer alms to Shri Guru; but due to poverty he was anxious as to how this could be achieved. He had gathered some flour and rice which he kept in the math. Other Brahmins ridiculed him saying, `How can you do Samaradhna? Out of whatever rice you have, you cannot give even one particle to each Brahmin.

Seeing his devotion, Shri Guru asked bhaskar one day to do samaradhna. He was glad and even encouraged by Shri Guru's words. He brought ghee and vegetables and prepared the food after bath. All brahmins thought that they would have to dine at their homes and have ordinary meals that day.

Shri guru asked bhaskar to invite all the brahmins for Samaradhna. Bhaskar said that the Brahmins played joke with him. So it would be better if a disciple was sent. As instructed the disciple invited Brahmins to come to Math for Samaradhna.

Shri Guru asked bhasker to bring the food prepared by him and cover it with Shri Guru's cloth. When this was done, Shri Guru sprinkled holy water from his bowl on the food and said, `without removing the covering cloth, take out the articles in other pots and serve them o the Brahmins.'

The Brahmins sat for dinner. Food was served to thousands and yet much food was in balance. After the Brahmins, had taken food they were requested to send their wives and children for dinner. After them, all others in ganagapur were invited for dinner with families. Then Shri Guru asked bhaskar to dine. After his dinner, it was found that all the food originally prepared was still in balance. Shri Guru asked Bhaskar to throw the food in the river so that the creatures in the water would also be satisfied.

This was a great miracle. The food sufficient only for three persons was provided to over 4000 persons. Several such incidents have occurred in the life of Shri Guru."

Contd....

गुरुचरित्र अध्याय अडतिसावा

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

नामधारक विनवी सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी । विस्तारावें कृपेंसीं । म्हणोनि चरणीं लागला ॥१॥

आर्त झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । चरित्र सांगें श्रीगुरुचें । माझें मन निववीं वेगीं ॥२॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । तूं जें जें मज पुससी । संतोष होतो आम्हांसी । गुरुचरित्र आठवितां ॥३॥

तुजकरितां आम्हांसी । लाभ जोडे परियेसीं । आठवली कथा सुरसी । विचित्र एक झालें असे ॥४॥

मागें कथन सांगितलें । जें भक्तीं द्रव्य आणिलें । स्वामीं अंगीकार नाहीं केलें । समाराधना करावी म्हणोनि ॥५॥

नित्य समाराधना देख । करीत होते भक्त अनेक । कधीं नाहीं आराणूक । नाहीं ऐसा दिवस नाहीं ॥६॥

ऐसें होतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं । असे काश्यप-गोत्रेंसीं । नाम तया 'भास्कर ' ॥७॥

अति सुक्षीण ब्राह्मण । आला आपण दर्शना म्हणोन । साष्‍टांगीं नमस्कारुन । भक्तिपूर्वक विनविलें ॥८॥

ते दिवसीं भक्तजन । करीत होते आराधन । उठवितात तया ब्राह्मणा । भोजन करीं म्हणोनियां ॥९॥

संकल्प करोनि तो ब्राह्मण । श्रीगुरुसी भिक्षा करवीन आपण । सवें सोपस्कार घेऊन । आला होता परियेसा ॥१०॥

त्रिवर्गाच्या पुरते देखा । सवें असे तंडुल-कणिक । वरकड पदार्थ त्या पूर्तिका । सोपस्कार असे त्यापाशीं ॥११॥

सर्व असे वस्त्रीं बांधिलें । नेऊनि मठांत ठेविलें । भक्तें आणिक त्यासी बोलाविलें । गेला तो ब्राह्मण भोजनासी ॥१२॥

भोजन करितां झाली निशी । आपण आला मठासी । गांठोडी ठेवी आपुले उशीं । मग निद्रा करी देखा ॥१३॥

नित्य घडे ऐसेंचि त्यासी । भक्त लोक येती आराधनेसी । आराणूक नव्हे त्यासी । नित्य जेवी समाराधनीं ॥१४॥

समस्त त्यास हांसती । पहा हो समाराधनेची आयती । घेऊनि आला असे भक्तीं । आपण जेवी नित्य समाराधनीं ॥१५॥

एकासी नव्हे पुरें अन्न । श्रीगुरुशिष्य बहु जन । केवीं करील हा ब्राह्मण । समाराधना करीन म्हणतो ॥१६॥

लाज नये त्यासी कैसी । समाराधना म्हणायासी । दे कां स्वयंपाक आम्हांसी । तूं करीं आजि माधुकरी ॥१७॥

ऐसें नाना प्रकारें त्यासी । विनोद करिती ब्राह्मण परियेसीं । ऐशा प्रकारें तीन मासी । क्रमिले त्या ब्राह्मणें तेथेंचि ॥१८॥

नित्य होतसे आराधन । त्यांचे घरीं जेवी आपण । गांठोडी उशाखालीं ठेवून । निद्रा करी प्रतिदिवसीं ॥१९॥

मास तीन क्रमिल्यावरी । समस्त मिळोनि द्विजवरीं । परिहास करिती अपारी । श्रीगुरुमूर्तिं ऐकिलें ॥२०॥

बोलाविती त्या ब्राह्मणासी । आजि भिक्षा करावी आम्हांसी । स्वयंपाक करीं वेगेंसी । म्हणती श्रीगुरु कृपासिंधु ॥२१॥

ऐकोनि श्रीगुरुच्या बोला । संतोष अपार द्विजा झाला । चरणावरी माथा ठेविला । हर्षे गेला आइतीसी ॥२२॥

आणिलें द्वय शेर घृत । शाका दोनी त्यापुरत । स्नान करुनि शुचिर्भूत । स्वयंपाक केला तये वेळीं ॥२३॥

समस्त ब्राह्मण तये वेळीं । मिळोन आले श्रीगुरुजवळी । म्हणती आजि आमुची पाळी । यावनाळ-अन्न घरीं ॥२४॥

नित्य होतें समाराधन । आम्ही जेवितों मिष्‍टान्न । कैंचा हा आला ब्राह्मण । आजि राहिली समाराधना ॥२५॥

श्रीगुरु म्हणती द्विजांसी । नका जाऊं घरांसी । शीघ्र जावें आंघोळीसी । येथेंचि जेवा तुम्ही आजि ॥२६॥

ब्राह्मण मनीं विचारिती । मठीं असे सामग्री आयती । स्वयंपाक आतां करविती । आम्हांसी निरोपिती याचिगुणें ॥२७॥

समस्त गेले स्नानासी । श्रीगुरु बोलाविती त्या ब्राह्मणासी । शीघ्र करीं गा होईल निशी । ब्राह्मण अपार सांगितले ॥२८॥

स्वयंपाक झाला तत्क्षण । सांगतसे श्रीगुरुसी ब्राह्मण । निरोप देती जा धांवोन । ब्राह्मण समस्त पाचारीं ॥२९॥

ब्राह्मण गेला गंगेसी । बोलावीतसे ब्राह्मणांसी । स्वामीनें बोलाविलें तुम्हांसी । शीघ्र यावें म्हणोनियां ॥३०॥

ब्राह्मण म्हणती तयासी । स्वयंपाक व्हावया होईल निशी । तुवां शीघ्र श्रीगुरुसी । भिक्षा करावी जाय वेगीं ॥३१॥

ऐसें ऐकोनि तो ब्राह्मण । गेला श्रीगुरुजवळी आपण । ब्राह्मण न येती ऐसें म्हणे । आपण जेवूं अपरात्रीं ॥३२॥

श्रीगुरु म्हणती तयासी । नेम असे आजि आम्हांसी । सहपंक्तीनें ब्राह्मणांसी । जेवूं आम्ही निर्धारीं ॥३३॥

ब्राह्मणांसहित आम्हांसी । जेवूं वाढीं गा तूं परियेसीं । जरी अंगीकार न करिसी । न जेवूं तुझे घरीं आम्ही ॥३४॥

ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी । जो निरोप द्याल आपणासी । तोचि निरोप माझे शिरसीं । ब्राह्मणांसहित जेवूं वाढीन ॥३५॥

ब्राह्मण मनीं विचारी । श्रीगुरु असती पुरुषावतारी । न कळे बोले कवणेंपरी । आपुलें वाक्य सत्य करील ॥३६॥

मग काय करी तो ब्राह्मण । विनवीतसे कर जोडून । मज न येती ब्राह्मण । विनोद करिती माझ्या बोला ॥३७॥

श्रीगुरु आणिक शिष्यासी । निरोपिती जा वेगेंसीं । बोलावूनि आणीं ब्राह्मणांसी । भोजन करा म्हणोनि ॥३८॥

शिष्य गेला धांवत । समस्त ब्राह्मणांतें बोलावीत । स्नानें करोनि आले त्वरित । श्रीगुरु-मठाजवळिक ॥३९॥

श्रीगुरु निरोपिती तयांसी । पत्रावळी करा वेगेंसीं । जेवा आजि सहकुटुंबेसीं । ब्राह्मण करितो आराधना ॥४०॥

चारी सहस्त्र पत्रावळी । कराव्या तुम्हीं तात्काळीं । उभा होता ब्राह्मण जवळी । त्यासी स्वामी निरोपिती ॥४१॥

या समस्त ब्राह्मणांसी । विनंति करावी तुवां ऐसी । तुम्हीं यावें सहकुटुंबेसीं । आपण करितों आराधना ॥४२॥

श्रीगुरुचा निरोप घेऊन । विनवीतसे तो ब्राह्मण । द्विज म्हणती त्यासी हांसोन । काय जेवा म्हणतोस आम्हां ॥४३॥

आम्हां इतुके ब्राह्मणांसी । एकेक शित न ये वांटयासी । आमंत्रण सांगावया न लाजसी । नमस्कारितोसि घडीघडी ॥४४॥

वृद्ध ब्राह्मण ऐसें म्हणती । निंदा न करा श्रीगुरु ऐकती । जैसें श्रीगुरु निरोपिती । तैसें बोलतो ब्राह्मण ॥४५॥

हो कां बरवें बरवें म्हणती । सकळ पत्रावळी करिती । ब्राह्मण श्रीगुरुपूजा त्वरिती । करिता झाला उपचारें ॥४६॥

त्रिकरणपूर्वक करी भक्ति । बरवी केली मंगळारती । तेणें श्रीगुरु संतोषती । ठाय घाला म्हणती वेगें ॥४७॥

स्वयंपाक आणूनि आपणाजवळी । ठेवीं म्हणती तये वेळीं । आणोनियां तात्काळीं । श्रीगुरुजवळी ठेविला ॥४८॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आमुचें वस्त्र घेऊनि अन्नासी । झांकोनी ठेवीं आम्हांपाशीं । म्हणोनि वस्त्र देती तये वेळीं ॥४९॥

झांकिलें वस्त्र अन्नावरी । कमंडलुउदक घेऊनि करीं । श्रीगुरु प्रोक्षिती अन्नावरी । अभिमंत्रोनि तये वेळीं ॥५०॥

बोलावूनि म्हणती ब्राह्मणासी । उघडों नको अन्नासी । काढूनि नेऊनि समस्तांसी । वाढीं वेगीं म्हणोनियां ॥५१॥

तूप घालूनि घटांत । ओतूनि घे आणिकांत । वाढीं वेगीं ऐसें म्हणत । निरोप देती श्रीगुरु ॥५२॥

ठाय घातले समस्तांसी । वाढीतसे ब्राह्मण परियेसीं । लोक पहाती तटस्थेसीं । महदाश्चर्य म्हणताति ॥५३॥

श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । वाढों लागा या द्विजासी । आणिक उठिले बहुतेसी । वाढूं लागले तये वेळीं ॥५४॥

भरोनि नेती जितुकें अन्न । पुनः मागुती परिपूर्ण । घृत भरलें असे पूर्ण । घट ओतूनि नेताति ॥५५॥

वाढिलें समस्त पंक्तीसी । सहपंक्तीं श्रीगुरुसी । जेवताति अतिहर्षी । द्विजवर पुसतसे ॥५६॥

जो जो मागाल तो पदार्थ । वाढूं वेगें ऐसें म्हणत । भागलेति क्षुधाक्रांत । क्षमा करणें म्हणतसे ॥५७॥

घृत असे आपुले करीं । वाढीतसे महापुरीं । विप्र म्हणती पुरे करीं । आकंठवरी जेविलों ॥५८॥

भक्ष्य परमान्न पत्रशाका । ब्राह्मण वाढिताति अनेका । शर्करा दधि लवणादिका । अनेक परी जेविले ॥५९॥

तृप्त जाहले ब्राह्मण देखा । हस्तप्रक्षालन करिती मुखा । उच्छिष्टें काढिती तात्काळिका । आश्चर्य म्हणती तये वेळीं ॥६०॥

तांबूलादि देती समस्तांसी । श्रीगुरु बोलावूनि तयांसी । बोलवा म्हणती आपुले कलत्रपुत्रांसी । समस्त येऊनि जेवितील ॥६१॥

आलें विप्रकुळ समस्त । जेवून गेलें पंचामृत । श्रीगुरु मागुती निरापित । शूद्रादि ग्रामलोक बोलावा ॥६२॥

त्यांचे स्त्रियापुत्रांसहित । बोलावीं शीघ्र ऐसें म्हणत । पाचारितां आले समस्त । जेवूनि गेले तये वेळीं ॥६३॥

श्रीगुरु पुसती ब्राह्मणांसी । आतां कोण राहिले ग्रामवासी । ते सांगती स्वामियासी । अत्यंज आहेति उरले ॥६४॥

बोलावा त्या समस्तांसी । अन्न द्यावें वाढून त्यांसी । जितुकें मागती तृप्तीसी । तितुकें द्यावें अन्न वेगीं ॥६५॥

तेही तृप्त झाले देखा । प्राणिमात्र नाहीं भुका ।; सांगताति श्रीगुरुनायक । डांगोरा पिटा ग्रामांत ॥६६॥

कोणी असती क्षुधाक्रांत । त्यांसी बोलवावें त्वरित । ऐसें श्रीगुरु निरोपित । हिंडले ग्रामीं तये वेळीं ॥६७॥

प्राणिमात्र नाहीं उपवासी । सर्व जेवले परियेसीं । मग निरोपित त्या द्विजासी । भोजन तुवां करावें ॥६८॥

श्रीगुरुनिरोपें भोजन केलें । मागुति जाऊनि अन्न पाहिलें । आपण जितुकें होतें केलें । तितुकें उरलें असे अन्न ॥६९॥

श्रीगुरु म्हणती तयासी । घेऊनि जावें अन्न त्वरितेसीं । घालावें जळांत जळचरांसी । तृप्त होती तेही जीव ॥७०॥

ऐसें तया दिवसीं विचारिती । सहस्त्र चारी झाली मिति । भूमीवरी झाली ख्याति । लोक म्हणती आश्चर्य ॥७१॥

इतुकें झालियावरी । श्रीगुरु त्या द्विजातें पाचारी । वर देती दरिद्र दुरी । पुत्रपौत्र होती तुज ॥७२॥

समस्त जाहले तटस्थ । देखिलें अति कौतुक म्हणत । अन्न केलें होतें किंचित । चारी सहस्त्र केवीं जेविले ॥७३॥

एक म्हणती श्रीगुरुकरणी । स्मरली असेल अन्नपूर्णी । अवतारपुरुष असे धणी । श्रीनृसिंहसरस्वती ॥७४॥

एक म्हणती अपूर्व देखिलें । पूर्वीं कथानक होतें ऐकिलें । पांडवाघरीं दुर्वास गेले । ऋषीश्वरांसमवेत ॥७५॥

सत्त्वभंग होईल म्हणोन । श्रीकृष्ण आला ठाकून । तेणें केलें अन्न पूर्ण । दुसरें आजि देखिलें ॥७६॥

नर दिसतो दंडधारी । सत्य त्रैमूर्ति-अवतारी । न कळे महिमा असे अपारी । म्हणती लोक अनेक ॥७७॥

यातें नर जे म्हणती । ते जाती अधोगतीं । वर्णावया नाहीं मति । म्हणती हाचि परब्रह्म ॥७८॥

नव्हे हा जरी ईश्वर । केवीं केलें अन्नपूर । होतें तीन अडीच शेर । चारी सहस्त्र जेविले केवीं ॥७९॥

आणिक एक नवल झालें । आम्हीं समस्तीं देखिलें । प्रेतातें जीव आणिलें । शुष्क काष्‍ठासी पल्लव ॥८०॥

आणिक ऐका याची महिमा । कोणासी देऊं आतां साम्या । कुमसीं होता त्रिविक्रमा । त्यासी दाखविलें विश्वरुप ॥८१॥

ग्रामांत होती वांझ महिषी । क्षीर काढविलें आपुले भिक्षेसी । वेद म्हणविले पतितामुखेंसी । अभिमंत्रितां श्रीगुरुमूर्तीं ॥८२॥

आणिक जाहलें एक नवल । कुष्‍ठी आला विप्र केवळ । दर्शनमात्रें झाला निर्मळ । आम्हीं देखिलें दृष्‍टीनें ॥८३॥

विणकरी होता एक भक्त । त्यासी दाखविला श्रीपर्वत । काशीक्षेत्र क्षण न लागत । एका भक्तासी दाखविलें ॥८४॥

आणिक अपार चरित्रता । अमित असे हो सांगतां । क्षितीवरी समस्त दैवतें । तयांचें नव्हे सामर्थ्य ॥८५॥

समस्त देवांतें आराधितां । आलास्यें होय मनकाम्यता । दर्शनमात्रें श्रीगुरुनाथा । सकळाभीष्टें होताति ॥८६॥

ऐसें म्हणती विप्रलोक । अपूर्व जाहलें कवतुक । ख्याति ऐकती समस्त देख । श्रीगुरुचें चरित्र ॥८७॥

सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं । याचि निमित्य बहुवसीं । शिष्य जाहले श्रीगुरुचे ॥८८॥

नाना राष्‍ट्रींचे भक्त येती । श्रीगुरुची सेवा करिती । अंतःकरणीं एकचित्तीं । भजणारांसी प्रसन्न ॥८९॥

गंगाधराचा नंदन । सरस्वती विनवी नमून । ऐका तुम्ही समस्त जन । भजा भजा हो श्रीगुरुसी ॥९०॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अन्नपूर्तिकद्विजचतुः-सहस्त्रभोजनं नाम अष्‍टात्रिंशत्तमोऽध्यायः ॥३८॥

ओंवीसंख्या ९०

श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

1 comment: