Tuesday, January 4, 2011

Angai Geet

अंगाई गीते (Lullaby songs)

 लहान मुलांना झोपवण्याच्या उद्देशाने जी गाणी म्हटली जातात त्यांना अंगाई गीते म्हणतात. हा बालगीतांचाच एक प्रकार आहे. ही गीते केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून सर्व जगभर ती प्रचारात आहेत. आई मुलाला पाळण्यात ठेवून किंवा मांडीवर घेवून त्याला झोपवते, म्हणूनच यांना पाळणागीते असेही म्हणतात.

अशा गीतांची रचना लहान, साधी, लयबध्द व नादमधुर असते. यांत वर्णनाची पुनरावृत्तीही असते. देवांनी आपल्या मुलांचे संरक्षण करावे म्हणून त्यात कित्येक देवतांची नावे घालण्याचीही  पद्धत आहे.

बाळाचे रूपवर्णन, त्याचा खेळ, त्याचे छंद, त्यःचे न्हाणे, जेवणे, अलंकार असे विषयही अंगाई गीतांत येतात. चांदोबा व मामा अशा गीतांमधून पुष्कळ ठिकाणी आढळतात. हा मामा नेहमी खंडणी असतो, त्याचा वाडा चिरेबंदी असतो, तो तालेवारही असतो. बाळाची अनेक कौतुके तो पुरवतो.

आणखी एक वर्णन म्हणजे बाळाच्या पाळण्याचे. हा पाळणा मामाने दिलेला असतो. तो चंदनी लाकडाचा असतो त्याला निरनिराळी रत्ने जडवलेली असतात व त्याची दोरी रेशमाची असते. बाळ झोपेनासा झाला कि कित्येकदा त्याला बागुलबुवाचे भयही दाखवलेले असते. जटाधारी गोसाव्याला ही बोलावले जाते. कित्येक अंगाई गीतांत काऊ, चिऊ, तांबु गाय यांनाही आमंत्रण असते.

अंगाई गीतांचाच आणखी एक आदर्शात्मक प्रकार असतो. त्यात आपल्या बाळाने राम व्हावे, कृष्ण व्हावे अशी आकांक्षा व्यक्त केलेली असते.
मराठी लोकसाहित्यात अंगाई गीते म्हणून रचलेल्या अनेक ओव्या पूर्वी घराघरातून ऐकायला मिळायच्या. त्यातल्या काही ओव्या अशा :-

अंगाई मंगाई | डोळा नये नीज ||
बाळाला ग ओज | पाळण्याची ||
ये तू ग गायी | खाग तू ग कोंडा ||
बाळाच्या भुकेला | दूधमांडा ||
येग तू ग गायी | चरोनी भरोनी ||
दावया बांधुनी | दूध काढू ||
बाळ माझा खेळे | आंगणीच्या पेळे ||
दिपती ग डोळे | सखियांचे ||

No comments:

Post a Comment